Read more
हा एका पुणेकराचा ब्लॉग आहे त्यामुळे स्वतःच्या जबाबदारीवर वाचण्याचे कष्ट घ्यावे.
कडा हि बाबा कदमांची कादंबरी मला फार आवडली. हि कथा आहे प्रकाश, रेखा आणि शमादेवीची! मुंबईत राहणाऱ्या अण्णा रेडेकरांच्या सल्ल्यावरून प्रकाश नोकरीच्या शोधात मुंबईला अण्णांच्या घरी राहायला येतो. परंतु अण्णांना हे सहन होत नाही आणि ते त्याला घरातून बाहेर काढतात. तापाने फणफणलेल्या प्रकाशला चाळीमधील मंगलाताई आपल्या घरी घेऊन जातात. मंगलाताईंच्या मुलीला म्हणजेच रेखाला त्याने घरी राहिलेला आवडत नाही परंतु तो आजारी असल्यामुळे ती त्याची काळजी घेते.
मंगलाताईंच्या ओळखीच्या नानू नावाच्या मुलाच्या मदतीने प्रकाश ड्रायविंग शिकतो आणि त्याला सुप्रसिद्ध अभिनेत्री असणाऱ्या शमादेवींच्या उर्फ देवीजींच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून नोकरी लागते. शमादेवींचा स्वभाव विक्षिप्त असतो. त्यांच्या घरातील वातावरण, माताजींचे वागणे इत्यादी गोष्टींमुळे त्यांचा स्वभाव असा झालेला असतो. प्रकाशचा साधा सरळ स्वभाव बघून त्या प्रकाशसोबत व्यवस्थित वागत असतात.
इकडे रेखा आणि प्रकाश एकमेकांवर प्रेम करू लागतात. देवीजीसुद्धा प्रकाशला जीव लावत असतात. नानू रेखाला आणि मंगलाबाईंना प्रकाशबद्दल आणि देवीजींबद्दल खोटे सांगतो. त्यामुळे त्या दोघी प्रकाशला नोकरी सोडण्यासाठी सांगतात. देवीजींच्या घरी मामाने चोरी केल्यामुळे त्यांचे आणि माताजींचे भांडण होते आणि देवीजीं माताजींना हाकलून लावतात. त्यांची मनस्थिती बिघडते. त्यांचा विचार करून प्रकाश नोकरी न सोडण्याचा निर्णय घेतो आणि हे रेखापासून लपवतो. रेखाला जेव्हा हे समजते तेव्हा तिचे आणि प्रकाशचे भांडण होते आणि ती प्रकाशला नोकरीवर जाऊ देत नाही.
इथून पुढे बऱ्याच गोष्टी घडतात आणि कथा वेगळ्या वळणावर जाते. मी इथे मुद्दाम काही लिहीत नाही कारण आपला कादंबरी वाचण्याचा उत्साह मला कमी करायचा नाहीये. नक्की वाचा. छान कादंबरी आहे
0 Reviews