Read more
ह्या महिन्यात आमच्या लायब्ररीमध्ये शोभा राऊत यांची “अवचित होता भेट तुझी” नावाची नवीन कादंबरी आली. लायब्ररियनने आवर्जून मला ती वाचायला दिली. नवीन लेखक आणि आकर्षक मुखपृष्ठ यामुळे मी ती कादंबरी वाचायला सुरुवात केली.
हि कादंबरी बऱ्यापैकी नवीन पिढीची आहे. नुपूर हे या कादंबरीमधील प्रमुख नायिकेचे नाव आहे. ती १ डॉक्टर आहे. नुपुरचे लग्न तिच्या घरच्यांनी अमेरिकेमधल्या डॉ. पराग याच्याबरोबर ठरवलेले असते. ह्या नुपूरच्या कॉलेजमधल्या ६ मित्रमैत्रिणींचा १ ग्रुप असतो. अर्थात हे ६ मित्रमैत्रिणीसुद्धा डॉक्टरच आहेत.
या ग्रुपमधील रिचा आणि जय हे १ प्रेमी युगल आहे. जय हा खेड्यामधील पण श्रीमंत खानदानी घराण्यामधील आहे आणि रिचा शहरामधील मॉडर्न कुटुंबामधील आहे. जयच्या खेड्यामध्ये डॉक्टर नसल्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला मेडिकल कॉलेज मध्ये शिकवलेले असते. शिक्षण झाल्यानंतर त्याला त्यांच्या गावामध्ये हॉस्पिटल चालवायचे असते. पण रिचाला खेड्यामधील राहणीमान आवडत नसल्यामुळे जयने शहरामध्ये तिच्यासोबत राहावे अशी तिची इच्छा असते.
तिचे मतपरिवर्तन करण्यासाठी जय तिला आणि बाकीच्या ग्रुपला घेऊन गावाकडे १ ट्रीप काढायची ठरवतो. नुपुरच्या लग्नाच्या १५-२० दिवस आधी हा बेत निश्चित होतो. आणि हि सर्व मंडळी जयच्या गावी जातात.
जयच्या घरचे राजेशाही आणि खानदानी वातावरण सर्वांना आश्चर्यचकित करते. रिचा सोडून बाकीच्या सर्वांना हे वातावरण आवडते. नुपूरसुद्धा घरातील सर्वांना आवडू लागते. पण तिचे आणि जयच्या मोठ्या भावाचे म्हणजेच शक्तीसिंहचे काही कारणावरून खटके उडतात. हा शक्तीसिंह विवाहित असून एका लहान मुलीचा बाप असतो. स्वभावाने थोडा रागीट असतो. त्यामुळे रिचा आणि नुपूर दोघींना तो अजिबात आवडत नाही.
शक्तीसिंह सर्वांना जंगलामध्ये ट्रीपसाठी घेऊन जातो. २-३ दिवस राहून परतीच्या वाटेवर असताना अचानक नुपुरचा पाय घसरून ती दरीमध्ये जाते. तिला वाचवण्यासाठी शक्तीसिंह तिच्या मागे दरीमध्ये जातो. तिला तो या संकटामधून वाचवतो. हे दोघे अनेक संकटे पार करत ३-४ दिवसाच्या अथक प्रयत्नांनंतर घरी सुखरूप पोहोचतात. या ३-४ दिवसांमध्ये शक्तीसिंह अनेक वेळा नुपुरचे प्राण वाचवतो आणि याचदरम्यान तो तिच्या प्रेमात पडतो. नुपुरलासुद्धा शक्तीसिंह आवडू लागतो. नंतर गावाकडची जत्रा संपवून सगळे मित्रमंडळी परत पुण्याला परततात.
नुपूरच्या लग्नाला फक्त १ आठवडा बाकी असतो. एकमेकांबद्दल गैरसमज, प्रेम, शक्तीसिंहचे वैवाहिक आयुष्य, नुपुरचे लग्न अश्या बऱ्याच गोष्टींमुळे संभ्रमात असलेले ते दोघे नक्की काय निर्णय घेतात? वाचकांच्या मनातील गोंधळसुद्धा कादंबरीच्या शेवटच्या भागामध्ये दूर होतो.
हि कादंबरी वाचताना आपण एखाद्या सिनेमाची कथा तर वाचत नाही ना? असं सतत मनामध्ये येतं. पण सिनेमा आणि वास्तव यामध्ये बराच फरक असतो. त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी खटकतात. असो. कादंबरी चांगली आहे. नवीन पिढीचे वातावरण असल्यामुळे वाचताना ती जवळची वाटते. सर्व ठिकाणांची वर्णने आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्ष असल्याची अनुभूती देतात. “अवचित होता भेट तुझी” हे शीर्षक नुपुरच्या शक्तीसिंहसाठी केलेल्या कवितेमधील १ ओळ आहे. हलकी-फुलकी आणि सुंदर अशी हि “अवचित होता भेट तुझी” कादंबरी एकदा वाचायला हरकत नाही.
1 Reviews
Hi
ReplyDelete